
कोल्हापूर : पुढारी ऑनलाईन डेस्क – कोल्हापूर जिल्ह्यातील वानरमारी समाजातील यापूर्वी कोणीही दहावी पास झाले नाही. पण यंदाच्या दहावी परीक्षेत याच समाजातील परसु पोवार या विद्यार्थ्याने यश मिळवलं आणि दहावी परीक्षा उत्तीर्ण केली. जंगल खोऱ्यातून राहणारा हा समाज आहे. शिक्षणापासून दूर असलेल्या या समाजातीलच परसूची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे. शिक्षण घेणे तर दूरचं; पोटासाठी मिळेल ते काम करून अर्थाजन करणाऱ्या या समाजातील परसु पोवार या मुलाने मिळवलेले यश वाखाणण्याजोगे आहे.
परसु पोवार हा शाहूवाडी तालुक्यातील आयरेवाडी गावातला रहिवासी आहे. तो २०२३ च्या दहावीच्या परीक्षेत ४८.२० टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झाला. श्रीराम हायस्कूल, भाग शाळा कोपार्डे येथे तो शिकत आहे. पुढे व्यावसायिक शिक्षण घेण्याची इच्छा मनाशी बाळगून परसूची वाटचाल सुरु आहे.
२०१९ पासून उमेद फौंडेशनच्या वसतीगृहात तो आणि त्याची ३ भावंडे राहतात. सांगरुळ येथील उमेद फौंडेशनने त्यांच्या शिक्षणाची जबाबदारी उचलली आहे. मुलांचे शिक्षण पूर्ण होऊन ते स्वावलंबी होऊपर्यंत ह्या मुलांची जबाबदारी उमेद फौंडेशन उचलते. शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी आणि त्यांना स्वावलंबी बनवण्यासाठी उमेद फौंडेशन कार्यरत आहे.
दरम्यान, उमेद फौंडेशन आणि या फौंडेशनचे सदस्य दशरथ आयरे यांनी पोवार भावंडांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचे कार्य केले आहे. दशरथ आयरे यांच्या गावातील वानरमारी समाजातील ही मुले होती. उमेद २०१५ पासून या मुलांना शैक्षणिक साहित्य वाटप करत असे. त्यावेळी ही मुले घरीच होती. उमेदचे वसतीगृह सुरु झाल्यानंतर या भावंडांना उमेद फौंडेशनच्या वसतीगृहात प्रवेश देण्यात आला, अशी माहिती उमेद फौंडेशनचे अध्यक्ष प्रकाश कृष्णात गाताडे यांनी दिली आहे.
दुर्गम भागात राहणारा, फिरस्ती असणारा हा समाज शाहूवाडीच्या जंगलामध्ये स्थायिक झालाय. पक्की घरे नाहीत; पण झोपड्यांमध्ये राहणारा, अगदी कमी बोलणाऱ्या आणि संख्येने तुरळक असणाऱ्या या समाजापर्यंत ‘परसू पवार पास झालाय’, ही आनंदाची बातमी अद्याप पोहोचलेली नाही. कारण, जंगलात राहणाऱ्या या समाजापर्यंत संदेश पोहोचवणाऱ्या माध्यमांचा तसा अभाव आहे. त्यामुळे जेव्हा परसुच्या कुटुंबीयांना ही आनंदाची बातमी कळेल, तेव्हा त्यांचा आनंद गगनात न मावणारा असेल, हे नक्की!
The post Exclusive : दुर्गम भागातून थेट 'उमेद'च्या वसतीगृहात! कोल्हापुरात वानरमारी समाजातील पहिलाच मुलगा दहावी पास appeared first on पुढारी.
from युथवर्ल्ड | पुढारी https://ift.tt/kTV0oC2
via मराठी कट्टा